सहकार मंत्र्यांचे ‘बेताल’ वक्तव्य: शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार !.......

 


    

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय," राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य केव" बेताल नसून, राज्यातील बळीराजाच्या स्वाभिमानाला आणि त्याच्या अस्तित्वाला दिलेला थेट आव्हान आहे. ज्या शेतकऱ्याच्या मतांवर निवडून येऊन सत्तेची ऊब अनुभवता, त्याच अन्नदात्याला अशा तुच्छतेने हिणवणे, हा सत्तेचा माज नाही तर दुसरे काय? निवडणुकीपूर्वी मतांसाठी याच शेतकऱ्यांपुढे हात पसरणारे, कर्जमाफीची आणि विकासाची शेकडो आश्वासने देणारे, आज सत्तेत बसल्यावर "निवडणुकीत असे बोलावेच लागते," अशी कबुली देत आहेत. हा केवळ शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही, तर लोकशाहीचाही अपमान आहे.

एकीकडे मराठवाड्यातील, विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीच्या प्रकोपाने अक्षरशः जमिनीवर कोसळला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला, उभी पिके डोळ्यादेखत सडून गेली आणि आता भविष्याच्या चिंतेने तो हतबल झाला आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि जगायचे कसे या प्रश्नाने तो सरकारकडे मदतीची याचना करत असताना, सहकार मंत्र्यांचे हे वक्तव्य शेतकऱ्यांसाठीभिक नको पण कुत्रा आवरअशीच परिस्थिती निर्माण करणारे आहे.कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठीनादनसून, ती एक संजीवनी आहे, निसर्गाच्या आणि सरकारच्या धोरणांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा एकदिलासाआहे.

 शेतकरी कर्जबाजारी का होतो, याचा विचार सरकार कधी करणार आहे का? कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती, शेतमालाला मिळणारा हमीभाव आणि व्यापाऱ्यांकडून होणारी लूट या चक्रव्यूहात तो पुरता अडकला आहे. सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणांमुळे देशांतर्गत बाजारपेठ कोसळते आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्याला बसतो. या सर्व जखमांवर फुंकर घालण्याऐवजी, सहकार मंत्री अशा वक्तव्यांनी त्यावर मीठ चोळत आहेत. हे महायुती सरकारचे शेतकऱ्यांप्रति असलेले धोरण आणि त्यांची मानसिकता स्पष्ट करणारे आहे.

शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येऊन, त्यांच्याच भावनांची क्रूर थट्टा करणे हे सत्ताधाऱ्यांना शोभणारे नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून, त्याच्या वेदनांची चेष्टा करून राज्य चालवता येत नसते. महायुती सरकारमधील मंत्र्यांची बेताल वक्तव्यांची मालिका आता महाराष्ट्राला नवीन राहिलेली नाही. पण सहकार मंत्र्यांच्या या वक्तव्याने तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

सरकारने हे लक्षात ठेवावे की, महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी आहे, पण तो लाचार नाही. तो आज शांत आहे, कारण तो सरकारकडून आशेने मदतीची अपेक्षा करत आहे. पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका. ज्या दिवशी या बळीराजाचा संताप जागा होईल, त्या दिवशी सत्तेची ही खुर्ची डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील शेतकरी या अपमानाचा आणि विश्वासघाताचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे. तुमच्या बेताल वक्तव्यांनी शेतकऱ्यांच्या मनात जी आग पेटवली आहे, ती विझवणे तुम्हाला महागात पडेल.   


Post a Comment

0 Comments